मा. खा. भास्करराव पाटील खतगावकर यांचा भाजपाला अखेरचा राम राम ; स्वगृही (काँग्रेसमध्ये) दाखल

0 0
Read Time:8 Minute, 45 Second

नांदेड (प्रतिनिधी) :- माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी भाजपाला अखेरचा राम राम करीत भाजपासोबत थाटलेला सात वर्षांचा संसार मोडीत काढत पुन्हा स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला आहे. भास्करराव पाटील खतगावकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या एकाधिकारशाहीला कंटाळून भाजपात होत असलेली आपली घुसमट थांबवत आपण आपल्या कार्यकर्त्यांसह पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याचे यावेळी सांगितले.

त्यांनी आपल्या निवेदनात म्हंटले आहे की, भारताचे माजी गृहमंत्री श्रद्धेय डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या राजकीय तालमीमध्ये माझी जडणघडण झाली. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक पदांवर काम करून लोकांना न्याय देण्याची संधी मला मिळाली. देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघातून जनतेच्या आशीर्वादाने मी तीन वेळा विजयी झालो. त्यासोबतच लोकसभेतही तीन वेळा प्रतिनिधीत्व करण्याची संधी मला जनतेने दिली. संपूर्ण नांदेड जिल्ह्यासह माझे कार्यक्षेत्र राहिलेल्या बिलोली व देगलूर या दोन्ही तालुक्यातील सामान्य माणसाचा विकास हेच माझे प्रमुख ध्येय राहिले आहे. त्यामुळे जनतेने मला नेहमीच साथ दिली. मला तर निवडून दिलेच, परंतु, मतदारसंघ आरक्षित झाल्यानंतर मी दिलेल्या उमेदवाराला सुद्धा त्यांनी विजयी केले आहे.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाने प्रभावित होऊन मी भारतीय जनता पक्षात जाण्याचा निर्णय घेतला. भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मी भाजपात दाखल झालो, तेव्हा जिल्ह्यामध्ये भाजपची ताकद सिमित होती. त्यामुळे नांदेड शहरासह ग्रामिण भागात पक्षाचा विस्तार करण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न केले.

माझ्या पुढाकारामुळे माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, माजी आमदार अविनाश घाटे, सध्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीराम पाटील राजूरकर, माजी खासदार सुभाष वानखेडे यांच्यासारखी दिग्गज मंडळी भाजपात आली. पक्षाच्या ग्रामिण भागातील प्रत्येक बुथपर्यंत कार्यकर्ता निर्माण करण्याचे काम मी प्रामाणिकपणे केले. माझ्या नेतृत्वाखालीच नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आली. मी पक्षात येण्याआधी जिल्हा परिषदेमध्ये भाजपचे संख्याबळ केवळ २ होते. माझ्याच काळात ते १४ पर्यंत वाढले. जिल्ह्यामधील कुंडलवाडी ही एकमेव नगरपालिका आहे, जिच्यावर माझ्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने निर्विवाद विजय मिळवला.

अशा पद्धतीने भारतीय जनता पक्षाची नांदेड जिल्ह्यात जोमाने वाटचाल सुरू असताना शिवसेनेत कार्यरत असलेल्या प्रताप पाटील चिखलीकर यांना भाजपात घेण्यात आले. त्यानंतर त्यांनी भाजपच्या निष्ठावंतांवर अन्यायाची मालिकाच सुरू केली. अवघा पक्ष चिखलीकरांच्या दावणीला बांधला गेला. भाजपातील जुने निष्ठावंत व आमच्या सारखी झोकून देऊन काम करणारी मंडळी बेदखल करण्याचे काम खा. चिखलीकर यांनी सुरू केले.

भारतीय जनता पक्ष हा शिस्तीचा पक्ष म्हणून ओळखला जातो. परंतु, बेशिस्तीचा कळस गाठण्याचे काम खा. चिखलीकर यांनी जिल्ह्यात केले आहे. ही बाब अनेकदा राज्याच्या नेतृत्वाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही दुर्दैवाने त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. उलटपक्षी चिखलीकरांना अधिक ताकद देऊन भारतीय जनता पक्षात होणाऱ्या अन्यायाला एकप्रकारे खतपाणी घातले गेले.

देगलूर-बिलोली मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपचा उमेदवार ठरवताना माझे मत विचारात घेणे अपेक्षित होते. परंतु, तसे न करता खा. प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हट्टामुळे शिवसेनेतून आयात केलेल्या सुभाष साबणे यांना उमेदवारी देण्यात आली. म्हणजे उमेदवार खा. प्रताप पाटील चिखलीकर यांनी ठरवायचा आणि त्याच्या पराभवानंतर त्याचे सारे खापर माझ्यावर फोडायचे, असे कारस्थान चालू असल्याचे मला स्पष्ट दिसू लागले होते. खरे तर राज्य नेतृत्वाने मध्यस्थी करून एखादा निष्ठावंत किंवा नवा चेहरा दिला असता तर या पोटनिवडणुकीत जोरदार लढत झाली असती. पण मी इतरांचे ऐकणारच नाही, अशी भूमिका घेऊन काम करणाऱ्या खा. चिखलीकरांनी स्वतःच भाजपसाठी असलेली एक संधी गमावून टाकली.

या संपूर्ण पार्श्वभूमिवर माझ्या समवेत काम करणारे गावागावातील सहकारी संतप्त झाले आहेत. जिथे प्रामाणिक कार्याला किंमत नाही, तिथे कामच का करायचे, असा त्यांचा सवाल आहे. त्यांनी ही भावना माझ्याकडे वारंवार बोलून दाखवली. अन्यायाची ही मालिका खंडीत झाली पाहिजे; अन्यथा दुसरा पर्याय शोधा, अशी सूचनाही मला अनेक सहकाऱ्यांनी केली. एकूणच भाजपातील एकाधिकारशाही, मित्रमंडळाचे वर्चस्व, निष्ठावंतांची मुस्कटदाबी व दलबदलुंना प्रोत्साहन यामुळे नांदेडची भाजप जणू चिखलीकरांची वैयक्तिक मालमत्ता झाली आहे. अशा ठिकाणी काम करणे माझ्या मनाला पटणारे नाही.

त्यामुळे मी भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत असून, आजच काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहे. माझ्यासोबत माजी आमदार तथा भाजप कार्यकारिणी सदस्य ओमप्रकाश पोकर्णा, नांदेड महानगर भाजपचे उपाध्यक्ष व माजी उपमहापौर सरजितसिंग गिल, कुंडलवाडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी अध्यक्ष बाबाराव पाटील भाले, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजू गंदीगुडे, भाजप युवामोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्य रवी पाटील खतगावकर. भाजप जिल्हा सचिव आनंदराव पाटील बिराजदार, भाजपचे उत्तर नांदेड विधानसभा माजी अध्यक्ष दीपक पावडे आदी प्रमुख पदाधिकारी भाजपचा राजीनामा देत असून, ते देखील माझ्या समवेत काँग्रेस पक्षात प्रवेश करीत आहेत.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *