“मुंबई आणि महाराष्ट्राची बदनामी करण्यासाठी सोशल मीडियाचा पद्धतशीर वापर केला जात आहे”

मुंबई | सोशल मीडियाचा वापर प्रत्येक क्षेत्रात केला जात आहे. मात्र सोशल मीडियाला कोणत्याही प्रकारचे निर्बंध किंवा मर्यादा नाहीत. याच मुद्यावरून शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून टीकेचे बाण सोडण्यात आले आहेत.

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. यामध्ये शिवसेना आणि कंगणा राणावतमधील संघर्ष असो वा त्यानंतर कंगणा राणावतने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी शब्दात उल्लेख करत केलेला अपमान. यामध्ये सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर झालेला आपल्याला दिसेल. कंगणाने मुख्यमंत्री आणि शिवसेनेवर टीका कताना ट्विटरचा वापर करत तिला वाटेल ती बेलगाम अशी टीका केली.

मुंबई आणि महाराष्ट्राची सुनियोजितपणे बदनामी करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला जात आहे. याचा अनुभव महाराष्ट्र आणि मराठी माणूस काही दिवसांपासून घेत आहे. या गॉसिपचा त्यांच्या पद्धतीने समाचार घेतला तर तुमची अभिव्यक्ती स्वातंत्र्याची काळी मांजरे आडवी येतात नाहीतर मुस्काटदाबीच्या बोंबा मारल्या जात असल्याचं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

दरम्यान, सरकारी बंधनाचा भाग म्हणून खोटीनाटी टीका सहन करणं काही यंत्रणांना अपरिहार्य असलं तरी सोशल मीडियावर चौखूर उधळणाऱ्यांनी निर्बंधाचा गैरफायदा घ्यायचा असं नाही, असंही अग्रलेखात म्हटलं आहे.