बीड: नांदेड जिल्ह्यातील एका तरुणाने आपल्या प्रेयसीला जाळून मारण्याचा प्रयत्न केला आहे. बीड जिल्ह्यातील मांजरसुंबा केज रस्त्यावरील येळंबघाट येथे ही घटना घडली. उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी त्या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील शेळगाव येथील रहिवाशी अविनाश राजूरे याचे त्याच गावातील एका २२ वर्षीय तरुणी सोबत प्रेमसंबंध जुळले होते. ते दोघेही पुण्यात एकत्र राहत होते. दिवाळी निमित्त शनिवारी हे दोघेही दुचाकीने पुण्याहून गावाकडे निघाले होते. शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास बीड जिल्ह्यातील मांजरसुंबा केज रस्त्यावरील येळंबघाट येथे अविनाशने आपली दुचाकी रस्त्याच्या कडेला उभी केली. त्यानंतर प्रेयसीला रस्त्यापासून दूर एका खड्यात नेऊन तिच्यावर प्रथम अॅसिड टाकले. त्यानंतर पेट्रोल ओतून तिला पेटवून देऊन तो तिथून निघून गेला.
जाळीत तरुणीने मदतीसाठी आरडाओरडा केला परंतु पहाटेची वेळ असल्यानं कुणीही मदतीला धावून येऊ शकले नाही. त्यात ती मोठ्या प्रमाणावर भाजली. तश्याच आवस्तेत ती तरुणी तब्बल १२ तास रस्त्यालगत पडून राहिली. दुपारी तीनच्या सुमारास एका वाहनधारकाला तिचा आवाज ऐकून त्यानं तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर जखमी तरुणीला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तिथं उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.या प्रकरणी त्या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.